जाकर्ता- इंडोनेशियाच्या जावा बेटावर झालेल्या प्रलयकारी भूकंपातील बळींची संख्या १६२ झाली आहे. यात शेकडोंहून अधिक जखमी झाले आहेत. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. मृतांमध्ये शाळकरी मुलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे इंडोनेशियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
इंडोनेशियात सोमवारी भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू पश्चिम जावा प्रांतातील सियांजुर भागात जमिनीखाली १० किलोमीटर खोल होता. भूकंपामुळे या परिसरात अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. अनेक इमारती कोसळल्या. त्यात शाळा आणि रुग्णालयांचाही समावेश होता. भूकंपामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली. कोसळलेल्या इमारतींच्या ढिगार्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. त्यात आतापर्यंत १६२ जण मृत्युमुखी पडले असून त्यात मुलांची संख्या जास्त आहे. भूकंप झाला तेव्हा येथील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी होते. या परिसरात इस्लामिक शाळा आणि मशिदी आहेत, अशी माहिती जावा प्रदेशाचे गव्हर्नर रिदवान कामिल यांनी दिली.