नवी दिल्ली:- इंडिगो एअरलाइन्सने दिल्लीहून पाटणासाठी निघालेल्या प्रवाशाला उदयपूरला पोहचवले. प्रवाशांच्या तक्रारीनंतर त्याला दुसऱ्या दिवशी पाटण्याला परत पाठवण्यात आले. याबाबत प्रवाशाने नागरी विमान वाहतूक महासंचालकांकडे (डीजीसीए) तक्रार केली. घडलेल्या प्रकरणात डीजीसीएने चौकशीचे आदेश दिले आहेत. इंडिगो एअरलाइन्सकडून महिनाभरात दुसऱ्यांदा या प्रकारची घटना घडली आहे. यापूर्वी १३ जानेवारीला विमान कंपन्यांनी इंदूरला जाणाऱ्या प्रवाशाला नागपूरला नेले होते.विमान कंपनीचा भोंगळ कारभाराचा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे.
अफसर हुसैन असे या प्रवाशाचे नाव आहे. हुसैनने पाटण्याला जाण्यासाठी इंडिगोचे तिकीट बुक केले होते. ३० जानेवारी २०२३ रोजी हुसैन विमानाच्या नियोजित वेळेवर दिल्ली विमानतळावर पोहोचले. मात्र चुकून त्याना उदयपूरला जाणार्या विमानात बसवण्यात आले. प्रवासी उदयपूरला पोहोचल्यावर त्याना झालेला प्रकार लक्षात आला.
या प्रकरणावर इंडिगोने म्हटले की, प्रवासी चुकीच्या विमानात चढला होता. त्यावर डीजीसीएने जर तो चुकीच्या विमानात चढला, तर प्रवाशाचा बोर्डिंग पास नीट का तपासला नाही? असा सवाल केला. डीजीसीएने या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. डीजीसीएच्या अधिकाऱ्याने म्हटले की, “आम्ही या प्रकरणी अहवाल मागवत आहोत आणि विमान कंपनीवर योग्य ती कारवाई केली जाईल.”