ठाणे:- ठाणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या सात कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.
आव्हाडांनी त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड देखील सोबत होती. आव्हाड म्हणाले की, ‘राजकारणाची पातळी मोठ्या प्रमाणात ढासळली आहे. ऑडिओ क्लिपमधील आवाज महेश आहेरचा नाही, हेही सिद्ध करून घेतले जाईल.’ आव्हाड यांच्या कन्या नताशा म्हटले की, ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर आम्ही तातडीने तक्रार दाखल केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील तातडीने सुरक्षा पुरविण्याची घोषणा केली. मात्र अद्याप आमच्याशी कोणताही संपर्क करण्यात आलेला नाही.