मुंबई- गोरेगाव येथील आरे कॉलनी परिसरात दोन बिबट्यांना पिंजर्यात जेरबंद केल्यानंतर आणखी एक मादी जातीचा बिबट्या नजरेस पडल्याची माहिती समोर आली आहे. आरे कॉलनी युनिट १५ येथे रविवारी सकाळी नर बिबट्या दिल्यानंतर त्याच दिवशी आणखी एक मादी जातीचा बिबटा दिसला असल्याचा दावा संजय गांधी नॅशनल पार्क रेस्क्यू टीमसह स्थानिकांनी केला आहे. आता आरे कॉलनीत वनविभागाने रेस्क्यू टीमची गस्त वाढवली आहे. दिवसाही येथे बिबट्या दिसत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
आरेतील युनिट १५ येथे १६ महिन्यांच्या मुलीवर हल्ला केल्यानंतर वनविभागाने एका बिबट्याला जेरबंद केले होते.त्यानंतर आठवड्यातच आणखी एक बिबट्या जाळ्यात अडकला.मुलीवर हल्ला केल्याच्या घटनास्थळापासून २०० ते ३०० मीटर अंतरावर हा बिबट्या आढळल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर पुन्हा येथे बिबट्या दिसल्याचे समजते.रविवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. पण त्यानंतर सकाळी सहाच्या सुमारास २० ते ३० स्थानिक रहिवाशांनी आणखी एक बिबटा पाहिल्याचे म्हटले आहे.जंगलाच्या दिशेने दिवसभर कुत्रे भुंकत होते. त्यामुळे जंगलात आणखी एक बिबटा असल्याचे नाकारता येत नाही.वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की,आम्ही येथील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करत आहोत. तसेच परिसरात गस्तही वाढवली आहे.वन विभागाने रेस्क्यू टीमच्या सदस्यांना त्यानुसार निर्देश दिले आहेत. कॅमेऱ्यांद्वारे निरीक्षण सुरू आहे.