बेलापूर – नवी मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक-१ साठी आयसीआयसीआय बँकेने सिडकोला ५०० कोटींचे कर्ज मंजूर केले आहे. या बाबत सिडको आणि बँक यांच्यात करार झाला आहे. या प्रकल्पाची फायनान्शियल क्लोजर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई मेट्रोच्या कामाला आता गती मिळणार आहे.
नवी मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक-१ साठी ३ हजार ४०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी २,६०० कोटी सिडकोने या प्रकल्पावर खर्च केले आहेत. उर्वरित खर्च आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज घेऊन केला जाणार आहे. त्यात आयसीआयसीआय बँकेने सिडकोला या प्रकल्पासाठी ५०० कोटीचे कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे. त्याचा करार सिडको आणि आयसीआयसीआय बँकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यानुसार या प्रकल्पासाठी बँक ५०० कोटींचे कर्ज देणार आहे. नवी मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक-१ बेलापूर ते पेंधर असा ११.१ किलोमीटरचा आहे. त्यात ११ स्थानके आहेत. त्यापैकी ५ स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित ६ स्थानकांची कामे सुरू आहेत. आयसीआयसीआय बँकेने केलेल्या कर्ज पुरवठ्यामुळे या प्रकल्पांच्या कामाला आणखी गती मिळेल.