रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-मालवण मतदार आमदार वैभव नाईक यांची पत्नी आणि भावासह रत्नागिरीत लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत सुमारे साडेचार तास चौकशी करण्यात आली.त्यानंतर आता येत्या ९ डिसेंबर रोजी पुन्हा कागदपत्रे घेऊन पुढील चौकशी करण्यासाठी वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बोलावले आहे.
रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाकडून आमदार वैभव नाईक यांना मालमत्तेच्या चाैकशीसाठी नाेटीस काढण्यात आली आहे.त्यानुसार काल साेमवारी रत्नागिरी कार्यालयात चाैकशीसाठी आले हाेते. यावेळी त्यांच्यासाेबत पत्नी स्नेहल आणि भाऊ सतीश नाईक आणि राजापूरचे आमदार राजन साळवी उपस्थित हाेते.आमदार नाईक यांची चाैकशी सुरु झाल्यानंतर आमदार साळवी घरी परतले.
वैभव नाईक यांनी पत्रकारांशी बाेलताना सांगितले की, १९९६पासून आपण व्यवसाय करीत असून, त्या वेळेपासून आपल्याकडील कागदपत्रे, कर भरल्याची माहिती आपण लाचलुचपत विभागाला दिली आहे. या विभागाने पत्नी व भावाचीही चौकशी केली. या सर्वांमागे राज्य सरकार विशेषत: भाजप असल्याचा आराेप त्यांनी केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यालये ही प्रत्येक जिल्ह्यात आहेत. परंतु, स्थानिक अधिकाऱ्यांवर सरकारचा विश्वास नसल्याने मला रत्नागिरीत तर आमदार साळवींना अलिबागला चौकशीसाठी बोलावले गेले. हा मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न असून, आपण यात दबणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले