लिलोंग्वे – दक्षिण-पूर्व आफ्रिकेत सध्या फ्रेडी या चक्रीवादळाने कहर केला आहे.या फ्रेडी चक्रीवादळामुळे मलावी, मोझांबिक आणि मादागास्कर या तीन आफ्रिकन देशांमध्ये ४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.तसेच सुमारे ७०० लोक जखमी झाले आहेत.पाऊस,पूर आणि भूस्खलनामुळे सुमारे ८८,००० लोक बेघर झाले आहेत.दरम्यान,मलावीचे अध्यक्ष लाझारस चकवेरा यांनी देशात १४ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
चक्रीवादळग्रस्त भागात लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यातही अडचणी येत आहेत.चक्रीवादळ फ्रेडीने फेब्रुवारीमध्ये मलावीमध्ये प्रवेश केला होता. ते आता शांत झाले असले तरी आणखी काही दिवस मुसळधार पावसाची शक्मयता आहे. दुसरीकडे, मोझांबिकमध्ये भूस्खलनामुळे अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक भागात मोठी पडझड झाली असून बऱ्याच भागांचा संपर्कही तुटला आहे. या आपत्तीतून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी अजूनही सुरू असलेल्या पावसामुळे त्यात व्यत्यय येत आहे.या वादळाचा सर्वांत मोठा फटका ब्लांटायर शहराला बसला आहे.
मलावीचे अध्यक्ष लाझारस चकवेरा यांनी गुरुवारी क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये पूरग्रस्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागाला विशेष अनुदानात्मक मदत देण्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की,या चक्रीवादळामुळे २०१ लोक जखमी तर ७९६ लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे.परिस्थिती काबूत आणण्यासाठी चक्रीवादळ प्रवण भागात ३१७ छावण्या उभारल्या आहेत.आतापर्यंत ४०,७०२ हून अधिक लोक बेघर झाले असल्याची माहितीही चकवेरा यांनी दिली.