जिनेवा – एकीकडे कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होण्याची चिन्हे नसताना, आता आणखी नव्या विषाणूने जगाची चिंता वाढली. मध्य आफ्रिकन देशांमध्ये मारबर्ग विषाणू पसरत आहे. हा नवा विषाणू कोरोना व्हायरस आणि इबोला व्हायरसपेक्षाही धोकादायक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. आफ्रिकन देशांमध्ये मारबर्ग विषाणूमुळे दहशत निर्माण झाली आहे. घानामध्ये आतापर्यंत मारबर्ग व्हायरसमुळे नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डब्लूएचओने दिली. मारबर्ग विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भावावर चर्चा करण्यासाठी डब्लूएचओने महत्त्वाची बैठक बोलावली. दरम्यान बैठक बोलावण्याआधी डब्लूएचओच्या अधिकाऱ्यांनी या विषाणू संसर्गाच्या गंभीरतेबाबत चर्चा केली होती. डब्लूएचओने सांगितले की, मारबर्ग विषाणू रोग हा एक विषाणूजन्य रोग आहे. यामुळे ताप येतो आणि शरीरांतर्गत रक्तस्राव होतो. या विषाणू संसर्गाचा मृत्यू दर ८८ टक्के इतका जास्त आहे. मारबर्ग विषाणू आणि इबोला विषाणू एकाच कुटुंबातील विषाणूचे वेगवेगळे प्रकार आहेत.
मारबर्ग विषाणू कसा पसरतो
मारबर्गला संक्रमित लोकांच्या रक्त स्रावाशी संपर्क आल्यास याचा संसर्ग होऊ शकतो. याशिवाय रुग्णांचे कपडे जसे की बेड इत्यादी वापरल्यासही या विषाणूचा संसर्ग पसरतो.