औरंगाबाद :- माजी मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज औरंगाबादसह इतर दोन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने चांगली कामगिरी करत आपला गड कायम राखला आहे. या पार्श्वभूमीवरच आदित्य ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा दौरा आयोजित केला आहे.
नुकतेच निवडून आलेले ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, स्थानिक रहिवासी, विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी आदित्य ठाकरे संवाद साधणार आहेत. साधारण दहा-बारा ग्राम पंचायतमध्ये ठाकरे गटाला यश मिळाले आहे. याच गावांत आदित्य ठाकरे सरपंचांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, आदित्य मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील जवळपास १५ गावांचा दौरा करतील, अशी माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.