सोलापूर- शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आगामी काळात बंड करुन शिंदे गटात गेलेल्या आमदार, खासदारांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. आदित्य ठाकरेंनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेले आव्हान स्वीकारत 7 नोव्हेंबरला सिल्लोड मतदारसंघात सभेचे आयोजन केले आहे. सत्तार यांच्या पाठोपाठ आदित्य ठाकरे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. आदित्य ठाकरे बुधवार, 9 नोव्हेंबर रोजी सोलापूर दौर्यावर जाणार असून सांगोला तालुक्यात सभा घेत नुकसानग्रस्त भागाची पाहणीही करणार आहेत.
आदित्य ठाकरे 9 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते 10 वाजता नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी संगेवाडी आणि मांजरी येथे बांधावर जाऊन शेतकर्यांशी संवाद सांधला होता. आदित्य ठाकरेही संगेवाडी आणि मांजरी येथे शेतकर्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत. तसेच नुकसानग्रस्त भागाची पाहणी ही करणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे नेते लक्ष्मण हाके यांनी दिली.