मुंबई – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षातर्फे आगामी मुंबई महापालिका निवडणुकामध्ये २५ ते ३० जागा लढवण्यात येणार आहेत.हे उमेदवार प्रामुख्याने उत्तर भारतीय मतदार असणार्या क्षेत्रातील मतदार संघात उभे केले जातील.तसेच या निवडणुकीत भाजपसोबत असलेली केंद्रातील युती या निवडणुकीतही कायम राहणार आहे,अशी माहिती आरपीआयचे सरचिटणीस गौतम सोनावणे यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी उत्तर भारतीय आघाडीची घोषणा आरपीआय गटाकडून करण्यात आली.उत्तर भारतीय आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदावर श्यामधर दुबे,सरचिटणीस रमेश संतलाल गौड आणि चिटणीस पदावर राकेश यादव यांची घोषणा यावेळी करण्यात आली.तसेच एक आठवड्यातच मुंबई कमिटी आणि इतर जिल्हा तसेच तालुका कमिटीची रचना करण्यात येणार आहे. रामदास आठवले यांच्यावर गेल्या ३० वर्षांपासून मुंबईतील हजारो उत्तर भारतीय लोकांनी विश्वास ठेवला आहे.आठवलेंचा विचार घेऊन तळागातील समाजापर्यंत पोहचणार असल्याचे श्यामधर दुबे यांनी सांगितले.उत्तर भारतीय समाजाच्या अनेक वस्त्या या आठवलेंच्या स्थानिक पातळीवर असलेल्या कामामुळे आज स्थिरावल्या आहेत.मुंबईतील बहुतांश झोपडीवासीय भागांत आजही आरपीआय आठवले गटाच्या कामामुळे मुंबईतील नागरिकांमध्ये सुरक्षित असल्याची भावना आहे. त्यामुळेच येत्या काळातही उत्तर भारतीयांच्या सेवेत अधिकाधिक मदत देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे दुबे म्हणाले.यावेळी त्यांनी उत्तर भारतीयांसाठीच्या टोल फ्री क्रमांकाची घोषणाही केली