सांगली-जिल्ह्यातील माणदेशातील आटपाडीचे ग्रामदैवत असलेल्या उत्तरेश्वर देवस्थानच्या कार्तिक यात्रेनिमित्त यंदा शेळ्या- मेंढ्याचा बाजार असून या बाजारात चक्क मर्सिडीज कारपेक्षा जास्त किंमतीचे बकरे आणि मेंढ्या विक्रीसाठी आल्या आहेत. माडग्याळ जातीच्या एका बकर्याची किंमत ७४ लाख रुपये इतकी मालकाने सांगितली आहे. शुक्र ओढा परिसरात पौर्णिमेपासून या यात्रेस प्रारंभ झाला आहे.
यात्रेतील या बाजारात दहा हजाराहून अधिक शेळ्या मेंढ्या खरेदी विक्रीसाठी आले आहेत.यात्रेमध्ये महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गोवा या राज्यातून व्यापारी दलाल खरेदीसाठी आले आहेत. पाच हजारापासून ५० लाख रुपये किमतीचे बकरे या यात्रेत विक्रीसाठी आले आहेत.ही यात्रा दहा दिवस चालणार असून दोन दिवस शेळ्या मेंढ्यांचा खरेदी विक्रीचा बाजार होत आहे . दोन दिवस चालणाऱ्या या शेळ्या मेंढ्याच्या बाजारात कोट्यावधी रुपयाची उलाढाल होत असते .पश्चिम महाराष्ट्रामध्ये माणदेशातील आटपाडी तालुक्यातील शनिवारचा आठवडा बाजार शेळ्या मेंढ्यासाठी प्रसिद्ध आहे.सकाळी सहा वाजता सुरू होणारा बाजार अवघा चार तास चालतो या बाजारात कोट्यावधीची उलाढाल होत असते.या यात्रेत शेकडो वाहने शेळ्या मेंढ्यांची ने- आण करत आहेत.हौशी मेंढपाळ मेंढ्यांचा कळप घेऊन वाजत गाजत नाचत गुलाल उधळत फटाक्याची आताशबाजी करत मिरवणुका काढत आहेत. हलगीच्या वाद्याने यात्रा घुमु लागली आहे. यात्रेनिमित्त विविध स्टॉल ओढा परिसरात उभारले जात आहेत.