*एनडीटीव्हीतुन बाहेर पडलेल्या रवीश कुमार यांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली : अदानी समूहाने एनडीटीव्हीचा ताबा घेतल्यानंतर बुधवारी एनडीटीव्हीचे संस्थापक-प्रवर्तक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी राजीनामा दिला. त्यापाठोपाठ रवीश कुमार यांनीही राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. १९९६ पासून गेली २७ वर्षे एनडीटीव्हीच्या माध्यमातून रवीश कुमार हे आपल्या पत्रकारिता आणि वृत्तांकनाच्या माध्यमातून समाजाच्या जवळ राहिले. त्यामुळे आजही त्यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर अनेकांनी एक सच्चा पत्रकार म्हणून त्यांना सलाम केल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, एनडीटीव्ही मधून राजीनामा देऊन बाहेर पडलेले रवीश कुमार यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे आणि आता ‘यूट्यूब चॅनल’ हाच माझा नवा पत्ता आहे, असे ट्विट केले आहे. ट्विटरद्वारे त्यांनी जनतेशी संवाद साधत आपल्या भवन व्यक्त केल्या आहेत. ‘माझ्या जगण्यामध्ये तुम्ही आहात, तुमचे प्रेम हीच माझी संपत्ती आहे असे ट्विट करत त्यांनी एक युट्यूब लिंक शेअर केली आहे. त्यावर एक २५ मिनिटांचा भावनिक व्हिडियो त्यांनी शेअर केला आहे. ते म्हणतात, आज एनडीटीव्ही मधून बाहेर पडलोय. पण ज्याप्रमाणे, बेटी जब बिदा होती है तो वो बडी दूर तक जाते हुए भी मुडकर देखती है, ऐसी आज मेरी स्थिती है, असे म्हणत, ते भावुक झाल्याचे पहायला मिळाले. ते असेही म्हणालेत,’आज चिडिया को उसका घोसला नजर नही आ राहा है, क्यो की उसका घोसला कोई और ले गया है, लेकिन कोई बात नही उसके सामने खुला आसमा है’. अशा प्रकारे भावना व्यक्त करत त्यांनी त्यांच्या जनतेशी संवाद साधला आहे.
राजीनाम्यानंतर रवीश कुमार यांनी एका ट्वीट करत म्हटले,आत्तापर्यंत तुम्हा प्रेक्षकांशी प्रदीर्घकाळ आणि एकतर्फी संवाद साधला आहे. आता माझ्या यूट्यूब चॅनलवर हाच माझा नवा पत्ता आहे. सर्वांना गोदी मीडियाच्या गुलामीशी लढा द्यायचा आहे”, असे रवीश कुमार यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे ट्वीटच्या शेवटी त्यांनी नेहमीप्रमाणे ‘आपका रवीश कुमार’ असे नमूद केले आहे. या ट्वीटमध्ये ते कोणत्या माध्यमातून सगळ्यांशी संवाद साधणार आहेत, त्याविषयीही त्यांनी माहिती दिली आहे.
सामान्यांचे प्रश्न मांडण्याची त्यांची आक्रमकता विशेषत: तरुणांमध्ये प्रचंड चर्चेचा विषय ठरली. ‘रवीश की रिपोर्ट’ किंवा ‘प्राईम टाईम’ शोच्या माध्यमातून त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. मात्र आज त्यांच्या राजीनाम्यामुळे माध्यम विश्वात प्रामाणिकपणा कधीही विकला जाऊ शकत नाही अशीच चर्चा सुरू झाली आहे.