नवी दिल्ली – आग्रा किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र सरकार सहआयोजक होण्यास सहमती दर्शवली. त्यामुळे आग्रा किल्यावर दिमाखात शिवजयंती साजरी केली जाईल.
राज्य सरकार सहआयोजक असेल तर आग्रा येथील किल्ल्यात शिवजयंती साजरी करायला परवानगी मिळेल. याबाबत राज्य सरकारने पुरातत्व खात्याला पत्र लिहावे, असे निर्देश दिल्ली हायकोर्टाने दिले होते. त्यानंतर महाराष्ट्र सरकार देखील सहआयोजक होण्यास तयार झाले. दरम्यान महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी पुरातत्व खात्याच्या महासंचालक व्ही.विद्यावती यांना पत्र लिहून, महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन हे सहआयोजक असतील असे सांगितले. शिवाय पत्रात शिवजयंतीच्या पूर्वतयारीसाठी १८ फेब्रुवारी आणि मूळ कार्यक्रमासाठी १९ फेब्रुवारी रोजी आग्रा किल्ला परिसर वापरण्याची परवानगी मागितली आहे.