मुंबई – आगामी सर्व निवडणुकांची भाजपकडून तयारी सुरु झाली आहे . याच तयारीचा एक भाग म्हणून, केंद्र व राज्य सरकारच्या सर्व जनहिताच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचवल्या जाणार आहेत. त्यासाठी सेल्फी विथ लाभार्थी हे अभियान उद्यापासून सुरु केले जाणार आहे. सेल्फी विथ लाभार्थी या मोहिमेची सुरूवात उद्या, सोमवारपासून छत्रपती संभाजीनगरातून होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविले जात आहे. शहरातील तापडिया नाट्यमंदिरात सोमवारी दुपारी १ वाजता या कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे.
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, पंकजा मुंडे यांची देखील यावेळी उपस्थिती राहणार आहे. याशिवाय राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्यास जिल्ह्यातील भाजपचे नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहचल्या का, हे देखील सेल्फी विथ लाभार्थी या उपक्रमातून जाणून घेण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.