पुणे-आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथे दुर्मिळ “पोवळा” जातीचा विषारी साप आढळून आला आहे. निसर्गमित्र दत्तात्रय राजगुरु यांनी सापाला सुरक्षित त्याच्या अधिवासात सोडून दिल्याची घटना आज रविवारी सकाळी घडली.
रत्नाकर पांडुरंग वाव्हळ यांच्या घराच्या ओट्यावर त्यांचे नातू व मुलगा सागर वाव्हळ हे बसले असता त्यांना लहान आकाराचा साप ओट्याच्या फरशीवर दिसून आला.हा साप लहान आकाराचा असल्याने त्यांनी चिमट्याने अलगद पकडून प्लास्टिक बरणीत ठेऊन निसर्ग अभ्यासक दत्तात्रय राजगुरव, शारदा राजगुरव यांच्याकडे या सापाची ओळख करून घेण्यासाठी गेले. तो साप “पोवळा” या जातीचा दुर्मिळ विषारी साप असल्याचे सांगितले.पोवळा सापास “रातसर्प”, काकसर्प या नावानेही ओळखले जाते. हा अतिशय दुर्मिळ असून तो शिंगवे परिसरात दुसर्यांदा आढळल्याची नोंद आहे. हा साप मातकट, खाकी रंगाचा असुन पोटाखालील बाजूस लालसर गुलाबी रंगाचा असतो. तोंड काळ्या रंगाचे व शेपटी थोडी बोथट असून शेपटीवर दोन काळे पट्टे असतात. पाला-पाचोळ्यात तीन ते सहा अंडी घालतो. हा साप साधारण पंधरा ते अठरा इंचापर्यंत वाढतो. हा एकदम सडपातळ असणारा साप डिवचल्यास शेपटीकडील भाग अंगठीसारखा गोल करून शेपटीखालील भगवा रंग दाखवून शत्रूचे लक्ष विचलीत करून स्वतःचे डोके व जीव वाचवतो. या सापाचे विष नाग,मण्यार या सापांच्या विषाप्रमाणे मनुष्याच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते.