आंबेगाव- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात चांडोली खुर्द येथील खालच्या मळ्यात ऊसतोड सुरू असताना अचानक दोन बिबटे दिसल्याने तिथल्या मजुरांनी काम सोडून पळ काढला. रविवारी दुपारी ज्ञानेश्वर इंदोरे यांच्या शेतात ही घटना घडली.
शेतकरी ज्ञानेश्वर इंदोरे यांच्या शेतात काल ऊसतोडणीचे काम सुरू होते.त्यावेळी उसाच्या फडातून गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला.त्यामुळे सर्व मजूर घाबरले.तेव्हढ्यात अचानक समोरच दोन बिबटे दिसले बिबट्यांना पाहताच मजुरांनी ऊसतोड थांबवून शेताबाहेर धूम ठोकली. त्यानंतर शेतकरी इंदोरे यांनी तत्काळ वनविभागाला कळवले. वन विभाग कर्मचार्यांचे पथक दाखल झाले. पण तोपर्यंत ते बिबटे तिथून पसार झाले.त्यावेळी केलेल्या पाहणीत बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले.नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन वनविभागाने केले. तर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.