संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 26 March 2023

अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ फडणवीस यांच्या नेतृत्वात होणारच!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अहमदनगर:- केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराला शुक्रवारी मंजुरी दिली. त्यामुळे औरंगाबादचे नाव आता छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे नाव धाराशिव झाले आहे. आता अहमदनगरचे नाव बदलण्याची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. नगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होणारच असा विश्वासही पडळकरांनी व्यक्त केला आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणारच, असे ट्विट पडळकर यांनी केले आहे.

दरम्यान, नगरच्या नामांतराच्या मागणीसाठी पडळकर यांनी चौंडी येथून रथयात्रा काढली होती. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीने रथयात्रेचे नियोजन करण्यात आले होते. 20 फेब्रुवारीला या रथयात्रेचा नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा निघाला होता.तसेच आमदार पडळकर यांनी या आधीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ करा, अशी मागणी केली होती. त्यांनी पत्र लिहून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. आता नेमकी ही मागणी पूर्ण होणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या