वॉशिंग्टन- अमेरिकन शेअर बाजारात गुरुवारी बंपर तेजी आली. त्यामुळे जगातील टॉप-१० अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. मात्र याला मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे दोन भारतीय उद्योगपती अपवाद ठरले. भारतीय बाजारात झालेल्या घसरणीमुळे त्यांच्या संपत्तीत घट झाली. अमेरिकन बाजारातील तेजीने एलन मस्क व जेफ बेजोस यांच्या संपत्तीत २० अब्ज डॉलर्सची भर पडली.
अमेरिकेच्या महागाई निर्देशांकात घट झाली. त्यामुळे गुरुवारी अमेरिकन बाजारात मोठी तेजी आली. नेसडॅक आणि डाऊजोन्सच्या निर्देशांकात मोठी वाढ झाली. डाऊजोन्सचा निर्देशांक ३.७० टक्के वाढला. तर नेसडॅक ७.३५ टक्क्यांनी वाढल्याने तो ११,११४ अंकावर बंद झाला. अमेरिकन शेअर बाजारातील तेजीचा फायदा एलन मस्कला झाला. त्याच्या संपत्तीत ९.६० अब्ज डॉलर्सची भर पडली. टेस्लाच्या समभागात ७.३९ टक्के वाढ झाली. जेफ बेजोस यांच्याही संपत्तीत एका दिवसात १० अब्ज डॉलरची भर पडली. ॲमेझॉनच्या समभागात १२ टक्क्यांची वाढ झाली. मात्र भारतीय बाजार कोसळल्यामुळे अनिल अंबानी यांच्या संपत्तीत १.५२ अब्ज तर गौतम अदानी यांच्या संपत्तीत १.३४ अब्ज डॉलरची घट झाली. हे दोन्ही उद्योगपती जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत ७ व्या आणि ८ व्या स्थानावर आहेत.