मुंबई- अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या डिझायनर अनिक्षा जयसिंघानीविरोधातील सरकारी वकीलांचा युक्तीवाद गिरगाव कोर्टाने मान्य केला आणि तिची 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. याप्रकरणी पोलिसांकडून अनिक्षाला उल्हासनगरमधून काल अटक करण्यात आली होती आणि आज तिला पोलिसांनी गिरगाव कोर्टात हजर केले. अतिरिक्त न्या. डी.डी. आल्मले यांनी हा निर्णय दिला.
या सुनावणीत सरकारी वकील जयसिंह देसाई यांनी कोर्टाला की,‘अनिक्षाने अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्यासाठी काही व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप बनावट स्वरुपामध्ये बनवल्या होत्या. त्या सगळ्या व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप्स फेब्रुवारी महिन्यात अमृता फडणवीस यांना पाठवण्यात आल्या होत्या. या सगळ्या क्लिप्स डिलीट करण्यासाठी तिने अमृता फडणवीस यांच्याकडे 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. अन्यथा संबंधित क्लिप्स व्हायरल करण्याची धमकी तिने अमृता यांना दिली होती. अनिक्षाचे वडील फरार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. अनिक्षाही त्यांच्या संपर्कात होती. तिची पोलिसांना कसून चौकशी करायची आहे. म्हणून तिला सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी.` त्यानंतर सरकारी वकिलांचे युक्तीवाद युक्तीवाद मान्य करत कोर्टाने तिला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
जयसिंघानी हिच्या विरोधात कट रचणे आणि खंडणी या आरोपांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २० फेब्रुवारीला दाखल एफआयआरमध्ये अमृता यांनी असा दावा केला आहे की अनिक्षा २०२१ पासून १६ महिने संपर्कात होती. १६ वेळा त्या तिला भेटल्या. ती फडणवीस यांच्या निवासस्थानी भेटली आणि तिने फडणवीस यांना ऑफर दिली की तिच्याकडे असलेली काही बुकींची माहिती देऊन आपण दोघीही पैसे कमावू. त्यानंतर तिने तिच्या वडिलांना एका पोलिस प्रकरणातून सोडवण्याच्या बदल्यात अमृता यांना थेट एक कोटीची ऑफर दिली, असा अमृता यांचा आरोप आहे.