नवी दिल्ली- सुप्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंगच्या अडचणी वाढणार आहेत. ईडीने बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगला 2017 च्या टॉलिवूड ड्रग्स मनी लाँडरिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. या प्रकरणी ईडीने त्यांना १९ डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणी ईडीने अनेक तेलुगू चित्रपट कलाकारांचीही चौकशी केली आहे. यापूर्वी गेल्या सप्टेंबरमध्ये रकुल ईडीसमोर हजर झाली होती.
बॉलिवूड मधील काही कलाकारंची ईडीकडून चौकशाही सुरु आहे. त्यात आता टॉलिवूडचे कलाकारही सुटलेले नाहीत. रकुल प्रीत सिंग ही मनोरंजन विश्वातील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने खूप कमी कालावधीत लोकांच्या हृदयात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.एलएससडी आणि एमडी सारख्या अंमली पदार्थांच्या पुरवठ्याचे खळबळजनक रॅकेट उघडकीस आल्यानंतर अनेक तपास यंत्रणातपासात गुंतल्या.
2 जुलै 2017 रोजी, कस्टम अधिकार्यांनी संगीतकार केल्विन मास्कारेन्हास आणि इतर दोघांना अटक केली होती आणि त्यांच्या ताब्यातून 30 लाख रुपयांची ड्रग्स जप्त केली होती. या ड्रग्ज रॅकेटच्या तपासात तो अनेक फिल्मी व्यक्ती, सॉफ्टवेअर इंजिनीअर आणि काही कॉर्पोरेट शाळांच्या विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरवत असल्याचे निष्पन्न झाले.आरोपींच्या मोबाईलमध्ये टॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींचे नंबरही सापडले होते, त्यानंतर अनेक कलाकार चौकशीच्या फेऱ्यात आले होते. २०२१ मध्ये ईडीने रकुल प्रीतचीही चौकशी केली होती. या प्रकरणी राणा दग्गुबती, पुरी जगन्नाथ, रवी तेजा, चार्मी कौर, नवदीप आणि इतर सेलिब्रिटींनाही नोटीस बजावण्यात आली.