संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 27 January 2023

अभिनेते विलास उजवणे यांची
गंभीर आजाराशी झुंज

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

चाहत्यांकडे आर्थिक मदतीचे आवाहन

मुंबई: -चार दिवस सासूचे’, ‘दामिनी’, ‘वादळवाट’ या सारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरांत पोहोचलेले डॉ. विलास उजवणे सध्या ब्रेन स्ट्रोक या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. या आजाराला तोंड देताना त्यांची संपूर्ण जमा पूंजी खर्च झाली आहे. त्यातच आता त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या एका मित्राने त्यांच्यासाठी आर्थिक आवाहन केले आहे.
ब्रेन स्ट्रोकशी झुंज देत असतानाच आता विलास उजवणे यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला आहे. यासाठी त्यांच्यावर एक मोठे ऑपरेशन करावे लागणार आहे. तर, यातच त्यांना कावीळची लागण देखील झाली आहे. या सगळ्या उपचारांसाठी त्यांनी आपली आयुष्यभराची मिळकत खर्च केली. मात्र, आता पुढील उपचारांसाठी त्यांनी चाहत्यांकडे मदतीचे आवाहन केले आहे.
विलास उजवणे यांचे मित्र राजू कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्टद्वारे सगळ्यांना एकत्र येऊन मदत करण्यास आवाहन केले आहे. सोबतच पोस्टद्वारे त्यांनी डॉक्टरांचे अकाऊंट डिटेल्स ही शेअर केले आहेत.
आपल्या पोस्टमध्ये कुलकर्णी लिहितात की, डॉ. विलास उजवणे हा राजा माणूस म्हणजे आमचा लाडका डॉक्टर मोठ्या अडचणीत सापडला आहे. गेली सहा वर्षे ब्रेन स्ट्रोकशी झुंज देणाऱ्या हा वाघ थोडा थकला आहे. अत्यंत साध्या सदनिकेत राहणारा हा कलाकार आपल्या आयुष्याची सर्व पुंजी या आजारांमध्ये खर्च करून बसला आहे आणि ती रक्कम थोडी थोडकी नाही. चांगली सुधारणा होत आहे असे वाटत होते, बाहेर पडत होते, कुठे परीक्षक तर, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून त्याच्या चाहत्यांना दिलासा देत होते. लवकरच हे आपली सेकंड इनिंग चालू करणार असे वाटत असताना नियती त्यांच्या पुढे दोन मोठ्या आजारांचे निष्ठुर दान टाकून निघून गेली.
ह्रदयविकाराचा त्रास झाला असून, त्यांचे मोठे ऑपरेशन तातडीने करणे अत्यावश्यक आहे. त्यात भरीला एक वेगळ्या काविळीची भर पडली आहे. ही कावीळ लाखोकरोडो लोकांमधे एखाद्यास होते. त्यामुळे त्यांच्या शरीरातील इतर ऑर्गनसवर वाईट परिणाम होत आहे. या कारणामुळे छोटी इस्पितळे त्यांना दाखल करत नाही. कोल्हापूरच्या इस्पितळात होते. पण परत यावे लागले. आता एकच उपाय मुंबई मधील मोठे हॉस्पिटल! तिथेच हे शक्य आहे. त्यामुळे खुपसा खर्च डोळ्यासमोर आ वासून उभा आहे. डॉक्टरजवळ असलेली गंगाजळी फारच त्रोटक आहे त्यात जवळ असलेल्या मेडिक्लेम व इतर पॉलिसी देखील संपुष्टात आल्या आहेत. गेली सहा वर्षे आजारात आणि जवळ काम नाही त्यात हे नवीन आजार. तेव्हा या चक्रव्युहातून या अभिमन्यूची सुटका होण्यासाठी आपण सर्व मित्रांनी खारीचा का होईना वाटा उचलू असे त्यांनी फेसबुकवर लिहीले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami