नांदेड- भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी (केसीआर) नांदेडच्या गुरुद्वारा मैदानामध्ये भव्य मंडपात आज दुपारी जाहीर सभा घेतली.‘अब की बार किसान सरकार`ची घोषणा चंद्रशेखर राव यांनी यावेळी दिली. राव म्हणाले की, ‘देशाला स्वतंत्र होऊ न 75 वर्ष झाले. किती पंतप्रधान आणि मुख्यमंत्री होऊन गेले, मात्र आतापर्यंत देशवासियांना पिण्याचे पाणी मिळत नाही. शेतीला पाणी नाही, वीज नाही.याची उपलब्धी नाही. देशामध्ये आता परिवर्तनाची गरज आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होतात, हे दुर्दैव आहे. शेतकरी आत्महत्येबाबत सरकारने उत्तरे दिली पाहिजेत.’ नंतर पत्रकार परिषदेतही त्यांनी याचा पुनरुच्चार केला.
देशपातळीवर भारत राष्ट्र समितीचा विस्तार करण्यासाठी आज चंद्रशेखर राव नांदेडमध्ये दाखल झाले होते. त्यांनी सर्वप्रथम नांदेडच्या गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर जाहीरसभा घेण्यासाठी राव नांदेडच्या मैदानावर पोहोचताच त्यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केली. चंद्रशेखर राव म्हणाले, ‘शेतकऱ्यांनी आता फक्त नांगर उचलणे नव्हे तर कायदा बनवला पाहिजे. तुम्हीच आमदार-खासदार बना. तेव्हाच शेतकऱ्यांनो अब की बार किसन सरकार येईल.`
ते पुढे म्हणाले, ‘भारत गरीब देश नाही. आपला देश अमेरिकेपेक्षाही धनवान आहे. नेत्यांचे काम प्रामाणिक आणि दमदार असेल तर अमेरिकेपेक्षाही प्रबल आर्थिक शक्ती बनू शकतो. भारतात संपत्ती आहे, त्या संपत्तीपासून प्रजा वंचित आहे. पाणी, भूमी, कोळसा, काम करणारे 140 कोटी जनता या देशात आहेत. अमेरिकेकडे फक्त 29 टक्के शेतीयोग्य जमीन आहे. चीनकडे 19 टक्के शेतीयोग्य जमीन आहे.भारताकडे एकूण 83 कोटी एकर जमीन आहे.यापैकी 70 टक्के जमीन शेतीयोग्य आहे. हे माझे नाही तर केंद्र सरकारचे आकडे आहेत,भारतात 1 लाख 40 हजार टीएमसी पाऊस होतो.यापैकी अर्ध्या पावसाचे बाष्पीकरण होते. 70-75 हजार टीएमसी पाणी शुद्ध नद्यांतून वाहते.काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या नद्यांतून हे पाणी वाहत असते.स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही पाण्याचा 30 टक्केच वापर करण्यात येतो. बाकी 50 हजार टीएमसी पाणी समुद्रात जाते. तरीही आपले नेते तमाशा पाहत आहेत. प्रत्येक ठिकाणी पाण्याची वानवा आहे. महाराष्ट्रातून कृष्णा, गोदावरी, पूर्णा, प्रवरा, बैनगंगा, मंजिरा, भीमा, प्राणहिता, इंद्रावतीसह अनेक लहान-मोठ्या नद्या आहेत. तरी पाण्याची समस्या का?’
‘मेक इन इंडिया, जोक इन इंडिया बनला आहे. मेक इन इंडिया काम करत असते तर प्रत्येक शहरांत बाजार निर्माण झाले असते. पण आपल्या बाजाराच चायनाच्या वस्तू मिळतात. मकर संक्रांतीला पतंग उडवण्यासाठी लागणाऱ्या मांजापासून, गणपतीच्या मातीपर्यंत आणि भारतीय राष्ट्रीय ध्वजापर्यंत सर्व चीनमधून येते. या देशात गेल्या 75 वर्षांत सरकार कोणी चालवले, 75 वर्षांत 44 वर्षें काँग्रेसने सत्ता चालवली. 16 वर्षे भाजपाने सत्ता चालवली. 70 वर्षे काँग्रेस आणि भाजपा यांच्याकडेच सत्ता होती. त्यामुळे दोषी काँग्रेस आणि भाजपाच आहे,’ असे राव म्हणाले.