बुलढाणा- सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाले आहेत.त्यांनी राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे.शेतकऱ्यांच्या मागण्यांवर २२ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घ्या,अन्यथा २४ नोव्हेंबरला मुंबईमध्ये हजारो शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा तुपकरांनी दिली आहे.रब्बी हंगामाच्या पेरण्या लांबल्या आहेत. त्यामुळे सरकारला आणखी आठ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.आता जीव गेला तरी मागे हटणार नसल्याचे तुपकर म्हणाले.
रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सोयाबीन आणि कापूस उत्पादकांच्या मागणीसाठी बुलढाण्यात रेकॉर्ड ब्रेक मोर्चा काढल्यानंतर काल बुलढाण्यात आंदोलनाच्या पुढच्या टप्प्याची घोषणा करण्यात आली.परतीच्या पावसाने सध्या रब्बीच्या पेरण्या लांबल्या आहेत. शेतकरी पेरणीची कामे करण्यात व्यस्त आहेत. याशिवाय खासदार राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पट्टयात आहे. शेतकऱ्यांच्या रब्बीच्या कामांवर व भारत जोडो यात्रेवर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून तुपकरांनी मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला आणखी आठ दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. मात्र,आठ दिवसांत मागण्या मान्य झाल्या नाही तर हजारो शेतकऱ्यांसोबत २४ नोव्हेंबरला मुंबईतील मंत्रालयाशेजारी असलेल्या अरबी समुद्रात जलसमाधी घेणार असल्याची घोषणा रविकांत तुपकरांनी केली आहे.