नवी दिल्ली – भारतीय लष्करी दलाच्या ‘अग्नीवीर’ भरती प्रक्रियेत बदल जाहीर केले आहेत. या बदलांतर्गत भरतीस इच्छुक उमेदवारांना आता प्रथम ‘ऑनलाइन’ सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईई द्यावी लागणार आहे.त्यानंतर दोन परीक्षा द्याव्या लागणार आहेत. सीईई म्हणजेच ‘ कॉमन एंट्रन्स एक्झाम’ ही परीक्षा सर्वात आधी दिल्यानंतर उमेदवारांना शारीरिक तंदुरुस्ती चाचणी म्हणजेच ‘फिजिकल फिटनेस ‘ परीक्षा आणि तिसर्या टप्प्यात ‘मेडिकल टेस्ट ‘ म्हणजेच वैद्यकीय तपासणीस सामोरे जावे लागणार आहे.भरती प्रक्रियेतील या बदलाबाबत फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत अधिसूचना प्रसृत होण्याची अपेक्षा असल्याचे सूत्रांनी शनिवारी सांगितले.आधीच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत उमेदवारांना प्रथम शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, त्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि नंतर अंतिम टप्प्यावर लेखी प्रवेश परीक्षा द्यावी लागत असे मात्र,आता ‘ऑनलाइन’ प्रवेश परीक्षा हा पहिला टप्पा असेल.भरतीसाठी पहिली ‘ऑनलाइन’ परीक्षा एप्रिलमध्ये देशभरात सुमारे २०० ठिकाणी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या बदलामुळे भरती मेळाव्यादरम्यान होणारी गर्दी कमी होईल.त्यामुळे भरती प्रक्रियेचे आयोजन व्यवस्थापन करणे सोपे होईल, असे मानले जाते. २०२३-२४ च्या भरतीपासून या योजनेंतर्गत इच्छुक असलेल्या सुमारे ४० हजार उमेदवारांना नवीन प्रक्रिया लागू होईल.या प्रक्रियेतील बदलाबाबत लष्कराकडून विविध वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देण्यात आल्या आहेत.याआधी या परीक्षेतील हजारो विद्यार्थ्यांवर करावा लागणारा मोठा खर्च आणि आयोजन-व्यवस्थापनाचा विचार करूनच हा परीक्षेतील बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत १९ हजार अग्नीवीर लष्करी दलात दाखल झाले आहेत. तर येत्या मार्च महिन्यात ४० हजार अग्नीवीरांची निवड केली जाणार आहे.