संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 22 March 2023

अखेर पवई तलावाचा सायकल ट्रॅक
तोडायला सुरुवात!६६ लाख खर्च

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणुन अर्धवट बांधकाम झालेला पवई तलावाचा सायकल ट्रॅक बेकायदा असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्यानंतर तो काढून टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. पालिकेच्या जल अभियंता विभागाने त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून शनिवारपासून हा सायकल ट्रॅक हटविण्यास सुरुवात केली आहे. पुढील दोन दिवसांत सायकल ट्रॅक हटवण्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. हा ट्रॅक तोडण्यासाठी ६६ लाख रुपये खर्च येणार आहे.

पालिका पवई तलावाशेजारी उभारत असलेल्या जॉगिंग आणि सायकल ट्रॅकला मुंबई उच्च न्यायालयाने ६ मे २०२२ रोजी बेकायदा ठरवले होते. इतकेच नाही, तर त्या ठिकाणी करण्यात आलेले बांधकाम तत्काळ हटवून तलाव क्षेत्र पूर्ववत करण्यास सांगितले होते. पाणलोट क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यासही न्यायालयाने मनाई केली.न्यायालयाच्या सूचनेनंतर सायकल ट्रॅक काढण्याचे सोडून पालिकेने त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र,नंतर ती मागे घेण्यात आली. आता ट्रॅक तोडण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.पाण्यात भराव टाकून साधारण ५० मीटरहून अधिक लांबीपर्यंतचा सायकल ट्रॅक बांधण्यासाठी पालिकेने सुरुवात केली होती.त्यासाठी तलावात ६ ते ८ मीटर रुंदीचा खडी-दगडांचा भराव टाकण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या काळात पवई तलाव परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानालगत असलेल्या पाण्यात ५० मीटरहून अधिक लांबीपर्यंतचा खडी-दगडांचा भरावा टाकण्यात येत होता. जेसीबीचा वापर करून भरावासाठी टाकण्यात आलेले दगड आता काढण्यात येत आहेत.

हा सायकल ट्रॅक हटवण्यासाठी सुमारे ६६ लाख रुपयांचा खर्च होत आहे. महापालिकेचा जल अभियंता विभागाने तो स्वतः करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ठेकेदारांची नियुक्ती करून त्यांच्या माध्यमातून सायकल ट्रॅक तोडण्यात येत आहे. चुकीचा सायकल ट्रॅक बांधण्याचा निर्णय पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे तो तोडण्याचा खर्च जबाबदार पालिका अधिकाऱ्यांकडून वसूल करावा,अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या