कोल्हापूर – पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून अंबाबाई मंदिर संदर्भ ग्रंथालय उभे करण्यात येणार असून या संदर्भ ग्रंथालयासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे शके १७८६ आणि शके १७९५ या कालखंडातील हस्तलिखित ग्रंथ प्राप्त झाले आहेत.
या संदर्भ ग्रंथालयासाठी शके १७८६ मधील गुरुचरित्राची प्राकृत ओवीबद्ध रचना असलेला हस्तलिखित ग्रंथ जगदीश गुळवणी या भाविकाने देणगी स्वरुपात सुपूर्द केला आहे.तसेच शके १७९५ च्या कालखंडातील गुरुचरित्राची प्रत धर्माधिकारी या भाविकाने दिली आहे,अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी दिली आहे. प्राकृत भाषेतील हा शके १७९६ मधील हस्तलिखित ओवीबध्द ग्रंथ हा नृसिंह गुरुचरित्र ग्रंथ असून तो हस्तलिखित स्वरुपातील असल्यामुळे दुर्मिळ आहे.९ इंच बाय ४ इंच आकाराच्या या ग्रंथांची सहाशे ते आठशे पाने हस्तलिखित स्वरुपात आणि चांगल्या अवस्थेत आहेत.हा गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे गाणगापूर, नरसिंहवाडी तसेच कारंजा येथील मध्ययुगीन कालखंडातील दत्त विभूती महाराज यांचे चरित्र आहे.
हे हस्तलिखित पूर्वीच्या काळातील कागदावर नैसर्गिक शाईने लिहिण्यात आले आहे.अशा हस्तलिखित ग्रंथांचा संदर्भांचा वापर करत पुस्तक निर्माण होत असते. त्याचबरोबर धर्माधिकारी या भाविकाने दिलेली शके १७९५ च्या कालखंडातील एक गुरुचरित्राची प्रत आहे. ती देखील देवस्थानच्या संदर्भ ग्रंथालयासाठी त्यांनी सुपुर्द केली आहे,असे धर्मशास्त्र मार्गदर्शक तथा पश्र्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सहाय्यक व्यवस्थापक गणेश नेर्लेकर-देसाई यांनी सांगितले आहे.