संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

अंबरनाथ येथीळ शिवमंदिर परिसर
सुशोभीकरणाला पुरातत्व खात्याची मंजुरी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अंबरनाथ :युनाेस्काेच्या यादीत असलेल्या अंबरनाथ येथील शिवमंदिर परिसराच्या विकासाची गेली अनेक वर्षे मागणी केली जात होती. आता अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसराचा कायापालट हाेण्याचा मार्ग अखेर माेकळा झाला आहे. यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने सादर केलेल्या आराखड्याला नुकतीच पुरातत्व खात्याने परवानगी दिल्याने प्राचीन शिवमंदिर परिसराचे सुशोभीकरण शक्य होणार आहे.
वालधुनी नदीच्या किनारी असलेल्या या मंदिराचे आणि परिसराचे रूप पालटण्यासाठी स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. खासदार शिंदे यांनी यासाठीचा निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिला होता. मात्र या कामासाठी भारतीय पुरातत्व खात्याची पूर्वपरवानगी आवश्यक होती. अशावेळी अंबरनाथचा प्राचीन वारसा आणि स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेल्या शिवमंदिराचे सुशोभीकरणासाठी अंबरनाथ नगरपालिकेने सादर केलेल्या आराखड्याला नुकतीच पुरातत्व खात्याची परवानगी मिळाली आहे. भारतीय पुरातत्व खात्याच्या वतीने शिव मंदिर परिसरातील १०० मीटर अंतरावरील सुशोभीकरण आणि दुरुस्तीच्या कामाला परवानगी देण्यात आल्याची माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली आहे. एकूण १३८ कोटींच्या या आराखड्यातील १२५ कोटींची कामे लवकरच सुरू केली जाणार आहेत. त्यामुळे धार्मिक आणि पर्यटन स्थळाच्यादृष्टीने येत्या वर्षभरात शिवमंदिर परिसराची नवी ओळख निर्माण हाेणार आहे. जिल्हा, राज्य आणि देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराची धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून वेगळी ओळख आहे. त्यात गेल्या सहा वर्षांत आर्ट फेस्टिव्हलच्या माध्यमातून शिव मंदिर आणि तेथील परिसराचे सर्वत्र आकर्षण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता या सुशोभिकरणामुळे या परिसराचे रूप पालटणार असून, वालधुनी नदी किनारी घाट, जलकुंड सुशोभीकरण, भक्त निवास, ऍम्पी थिएटर, प्रदर्शन गृह, कुंडांचे सुशोभीकरण अशी अनेक कामे केली जाणार असल्याने या परिसराला नवी झळाळी मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शिवमंदिर परिसराचे स्वरूप अधिकच आकर्षक होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या