मुंबई- अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणूकीत शिवसेना उध्दव बाळाहासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतूजा लटके यांच्या निवडणूक प्रचारासाठी शिवसैनिकांसोबत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन मेळावा घेऊन प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.
आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मतदारसंघात प्रचाराच्या माध्यमातून जोरदार वातावरण निर्मिती केली. घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधण्याचा पूरेपूर प्रयत्न करण्यात आला. बाईक रॅलीही काढण्यात आली. या मतदारसंघातील शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद सावंत, काँग्रेसचे क्लमू डायस, राष्ट्रवादीचे अभिजीत राणे यांच्यावर महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उमेदवाराच्या प्रचाराची दूरा सांभाळण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान, भाजपाच्याही स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवार मुरजी पटेल यांच्या प्रचारासाठी स्थानिकांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला.